Sunday, June 15, 2008

चेरीची चटणी

साहित्य:
१. चेरी - २५-३० फळं
२. शेंगदाणे - १ वाटी
३. तीळ - १/२ वाटी
४. हिरवी मिरची - ३ ते ५
५. मीठ - चवी प्रमाणे
६. साखर - चवी प्रमाणे
७. कढीपत्ता पूड - २ ते ३ चमचे
८. कोथिंबीर - १ वाटी (किंवा कोथिंबीर पेस्ट २ मोठे चमचे)
९. पाणी - १/२ वाटी ते १ वाटी
१०. लिंबू - १ मध्यम आकाराचा किंवा २ लहान आकाराचे

कृती:
१. चेरीच्या फळांमधून बिया काढून टाकाव्यात.
२. तीळ लालसर भाजून घ्यावे.
३. शेंगदाणे भाजून घ्यावेत.
४. हिरवी मिरची, चेरीचा गर, तीळ, शेंगदाणे, कोथिंबीर मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यावे.
५. या मिश्रणात थोडं थोडं पाणी घालून एकजीव होईपर्यंत मिक्सरमधून पुन्हा फिरवून घ्यावे व एका पात्रात मिश्रण काढून घ्यावे.
६. त्यात कढिपत्तापूड, मीठ, साखर, लिंबूरस घालून ढवळावे.

विशेष सूचना:
आवडीनुसार चेरी, कोथिंबीर, मिरची यांचं प्रमाण कमी जास्त करता येईल. चेरी दुप्पट घेतल्यास चटणी सरसरीत होईल व जास्त मिरची घालावी लागेल. या चटणीमध्ये जिरेपूडही घालता येईल. संत्र्याची एखाद-दुसरी फोड टाकल्यास चव मस्त येते.
चेरी आंबट असल्यास लिंबूरस कमी घ्यावा.
ही चटणी फ़्रिजमध्ये २-४ दिवस चांगली राहते. धिरडे, दोसा, पोळी, थालिपीठ, पुरी, ब्रेड, नगट्स, वॅफ़ल्सबरोबर छान लागते.

पूर्वतयारीसाठी उपयुक्त गोष्टी

या ब्लॉगवर या पुढे प्रसिद्ध होणार्‍या पाककृतींमध्ये पूर्वतयारीत वारंवार लागणार्‍या वस्तूंची कृती इथे देत आहे.

१. कोथिंबीरीची पेस्ट
कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत वाटून घ्यावी. ही पेस्ट फ़्रिजमध्ये २ आठवडे चांगली राहते. कोथिंबीरीपेक्षा ही पेस्ट वापरायला सोपी जाते. साधारणपणे वाटीभर कोथिंबीरीसाठी १ डाव पेस्ट हे प्रमाण आहे.

२. कढिपत्ता पूड
कढीपत्ता अधिक टिकावा, म्हणून थोड्या तेलावर परतून घ्यावा व मिक्सरमधून त्याची पूड करून घ्यावी.
या ब्लॉगविषयी

व्हिगन/वन्यज/हरितज आहारपद्धतीबद्दल कसंकाय यांच्या ब्लॉगवर बरीच माहिती मिळाली. भारतीय संस्कृतीत पाककृतींमध्ये दुध, दही, तूप यांचा समावेश असलेले अनेक पदार्थ पूर्वापार लोकप्रिय आहेत. "दूध-तूप सोडायचं, मग हे पदार्थ कसे करणार?" हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. व्हिगन जीवनशैली टाळण्यामागे ही महत्त्वाची बाब आहे हे लक्ष्यात घेऊन व्हिगनपद्धतीने पदार्थ बनवण्याचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मी स्वत: व्हिगन नसल्यामुळे लोकांना "दूध-तूप खाऊ नका" असा सल्ला देणार नाही. त्याप्रमाणेच, या ब्लॉगवरील सर्व पाककृती व्हिगन/वन्यज/हरितज जीवनशैलीशी सुसंगत असतीलच असं नाही. पण एक प्रयोग म्हणून इथल्या पाककृती अवश्य करून पहाव्यात ही विनंती.
आपल्याला ह्या पाककृती कशा वाटल्या हे अवश्य कळवावे.
धन्यवाद.

-खादाड