Thursday, November 6, 2008

आमरस व कोथिंबिरीचे पराठे

साहित्य:
१. कणीक - १/२ वाटी
२. रवा - १/२ वाटी
३. बेसन - १ मोठा चमचा
४. आमरस/मँगो पल्प - १ मोठा चमचा
५. ओवा - १ चमचा
६. सैंधव मीठ - चवीनुसार
७. तेल - २ मोठे चमचे
८. कोथिंबीर - आवडीनुसार
९. पाणी - १/४ वाटी

कृती:
१. रवा, बेसन, कणीक व आमरस, ओवा, सैंधव मीठ एकत्र करावे.
२. त्यात १ १/४ चमचा तेल घालावे व पीठ व्यवस्थित मळून घ्यावे.
३. कोथिंबीर व थोडंसं पाणी घालून पुन्हा मळून घ्यावे.
४. या पीठाचे पराठे लाटावे. लाटताना पोळपाटाला चिकटू नये म्हणून थोडा कणकेचा हात लावावा.
५. मंद आचेवर तवा गरम करावा व थोडं तेल लावून त्यावर दोन्ही बाजूंनी पराठे व्यवस्थित शेकून घ्यावेत.


विशेष सूचना:
चेरीच्या चटणीबरोबर किंवा जॅम, मार्मलेड, लोणच्याबरोबर हे पराठे मस्त लागतात. आमरस थोडा जास्त असल्यास पाणी अगदी कमी वापरावं. कणीक, रवा व बेसन यांचं प्रमाण आवडीनुसार व आवश्यकतेनुसार बदलता येईल.
या ब्लॉगविषयी

व्हिगन/वन्यज/हरितज आहारपद्धतीबद्दल कसंकाय यांच्या ब्लॉगवर बरीच माहिती मिळाली. भारतीय संस्कृतीत पाककृतींमध्ये दुध, दही, तूप यांचा समावेश असलेले अनेक पदार्थ पूर्वापार लोकप्रिय आहेत. "दूध-तूप सोडायचं, मग हे पदार्थ कसे करणार?" हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. व्हिगन जीवनशैली टाळण्यामागे ही महत्त्वाची बाब आहे हे लक्ष्यात घेऊन व्हिगनपद्धतीने पदार्थ बनवण्याचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मी स्वत: व्हिगन नसल्यामुळे लोकांना "दूध-तूप खाऊ नका" असा सल्ला देणार नाही. त्याप्रमाणेच, या ब्लॉगवरील सर्व पाककृती व्हिगन/वन्यज/हरितज जीवनशैलीशी सुसंगत असतीलच असं नाही. पण एक प्रयोग म्हणून इथल्या पाककृती अवश्य करून पहाव्यात ही विनंती.
आपल्याला ह्या पाककृती कशा वाटल्या हे अवश्य कळवावे.
धन्यवाद.

-खादाड