Sunday, August 24, 2008

पौष्टिक उपमा

साहित्य:
१. मोड आलेले अल्फ़ाल्फ़ा १ १/२ वाटी
२. मोड आलेले गहू - १/२ वाटी
३. रवा - १/२ वाटी
४. कांदा चिरून - १/२ वाटी
५. हिरवी मिरची - २ ते ३
६. नारळाचा चव किंवा किसलेले खोबरे - १/२ वाटी
७. तेल - १ डाव
८. मोहोरी - १ मिठाचा चमचा
९. जिरे - १ मिठाचा चमचा
१०. हळद - १ मिठाचा चमचा
११. मीठ - चवीनुसार
१२. कोथिंबीर - आवडीनुसार
१३. पाणी - ३-४ वाट्या

कृती:
१. सुरवातीला रवा लालसर भाजून एका भांड्यात काढून ठेवावा.
२. कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे घालून फोडणी करावी.
३. फोडणी तडतडल्यावर त्यात मिरच्या बारीक चिरून घालाव्यात व चिरलेला कांदा घालावा.
४. मंद आचेवर कांदा लालसर होऊ द्यावा.
५. मोड आलेले अल्फ़ाल्फ़ा, मोड आलेले गहू कढईत घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे.
६. या मिश्रणात हळद घालून थोडे परतावे.
७. नारळाचा चव किंवा खोबर्‍याचा कीस व भाजलेला रवा मिश्रणात घालावा.
८. रवा व नारळ व्यवस्थित मिसळला की त्यात थोडं थोडं पाणी घालून सारखं ढवळत रहावं.
९. पाणी घालतानाच मीठ घालावे.
१०. मिश्रण घट्ट झाल्यावर कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी मंद आच राहू द्यावी व नंतर विस्तव बंद करावा.
११. उपमा तयार झाल्यावर आवडीनुसार त्यात कोथिंबीर घालावी.


विशेष सूचना:
फोडणी करताना त्यात थोडा कढिपत्ता टाकल्यास मस्त स्वाद येतो. या उपम्याबरोबर ओवा व मीठा घालून भरपूर घुसळून तयार केलेलं ताक छान लागतं. (ताक दह्यापासून किंवा सोया-योगर्टपासून बनवता येईल.)

No comments:

या ब्लॉगविषयी

व्हिगन/वन्यज/हरितज आहारपद्धतीबद्दल कसंकाय यांच्या ब्लॉगवर बरीच माहिती मिळाली. भारतीय संस्कृतीत पाककृतींमध्ये दुध, दही, तूप यांचा समावेश असलेले अनेक पदार्थ पूर्वापार लोकप्रिय आहेत. "दूध-तूप सोडायचं, मग हे पदार्थ कसे करणार?" हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. व्हिगन जीवनशैली टाळण्यामागे ही महत्त्वाची बाब आहे हे लक्ष्यात घेऊन व्हिगनपद्धतीने पदार्थ बनवण्याचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मी स्वत: व्हिगन नसल्यामुळे लोकांना "दूध-तूप खाऊ नका" असा सल्ला देणार नाही. त्याप्रमाणेच, या ब्लॉगवरील सर्व पाककृती व्हिगन/वन्यज/हरितज जीवनशैलीशी सुसंगत असतीलच असं नाही. पण एक प्रयोग म्हणून इथल्या पाककृती अवश्य करून पहाव्यात ही विनंती.
आपल्याला ह्या पाककृती कशा वाटल्या हे अवश्य कळवावे.
धन्यवाद.

-खादाड